पुणे- पुणे परिसरातील उद्योगांची उत्पादकता जून महिन्यात 73 टक्क्यांवर गेली आहे. मे महिन्यामध्ये ही उत्पादकता 70 टक्के इतकी होती. फेब्रुवारी- मार्च महिन्यामध्ये पुणे परिसरातील उत्पादकता 85 टक्क्यांवर गेली होती. ती पातळी गाठण्यासाठी आणखी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर या संस्थेने कुटीर, लघू, मध्यम आणि मोठ्या 150 उद्योगांचा आढावा घेऊन तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मे महिन्यातील 70 टक्क्यांच्या तुलनेत जून महिन्यात 77 टक्के कर्मचारी परत कामावर रुजू झाले आहेत. फेब्रुवारी – मार्च महिन्यात हे प्रमाण 86 टक्के होते.
सर्वेक्षणात भाग घेतलेल्या कंपन्यांना उत्पादन पूर्वपदावर येण्यास किती वेळ लागेल असे विचारले गेले. 23 टक्के कंपन्यांनी सांगितले की, त्याचे उत्पादन पूर्वपदावर आले आहे. 54 टक्के कंपन्यांनी यासाठी सहा महिन्याचा तर 24 टक्के कंपन्यांनी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागेल असे सांगितले.
सर्वेक्षण घेण्यात आलेल्या एकूण कंपन्यांमध्ये 20 टक्के कंपन्या कुटीर, 26 टक्के कंपन्या लघू, 23 टक्के कंपन्या मध्यम आणि 31 टक्के कंपन्या मोठ्या वर्गातील होत्या. त्याचबरोबर 66 टक्के कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील, 17 टक्के कंपन्या सेवा क्षेत्रातील आणि 16 टक्के कंपन्या दोन्ही क्षेत्रातील होत्या. सर्वेक्षणातील माहितीनुसार मोठ्या कंपन्यातील कामकाज वेगाने पूर्वपदावर येत आहे. त्या तुलनेत मध्यम आणि आणि लघु कंपन्यांतील कामकाज पूर्वपदावर येण्याचे प्रमाण कमी आहे. तर कुटीर उद्योगातील कामकाज पूर्वपदावर येण्याचे प्रमाण केवळ 50 टक्क्यांच्या जवळपास आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत कामकाजावर बराच परिणाम झाला होता. त्यानंतर कामकाज सुधारत गेले आणि फेब्रुवारी महिन्यात उत्पादकता 85 टक्क्यांवर गेली होती. त्यानंतर ती कमी होत गेली आणि मे महिन्यामध्ये ही उत्पादकता 70 टक्क्यांवर गेली होती. आता ती पुन्हा 73 टक्क्यांवर आली आहे.