नवी दिल्ली : देशात सध्या काही राज्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या निवडणूका सुरु आहेत. देशात बिहारच्या विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. तर आता दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या ‘एमएलसी’ निवडणुकी अगोदर बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायवती यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. समाजवादी पार्टीला हरवण्यासाठी गरज पडल्यास बसपा भाजपा किंवा अन्य कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे मोठे विधान मायावती यांनी केले आहे.
If needed, BSP will support BJP or any other party to defeat Samajwadi Party (SP) in the upcoming MLC elections in the state. We have taken this decision to show our firm stand against SP's anti-Dalit actions: BSP chief Mayawati pic.twitter.com/NEKBN2tL8D
— ANI UP (@ANINewsUP) November 2, 2020
गरज पडल्यास बसपा राज्यातील आगामी एमएलसी निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीला हरवण्यासाठी भाजपा किंवा अन्य कोणत्याही पक्षाला पाठिंबा देईल. समाजवादी पार्टीच्या दलित विरोधी कार्यांविरोधातील आमची कठोर भूमिका दाखवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे बसपा प्रमुख मायावती यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यसभा निवडणुकीत बसपाचे उमेदवार प्रकाश बजाज यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. त्यांनी समाजवादी पार्टी रामजी गौतम यांच्याविरूद्ध उमेदवारी दाखल केली होती. बसपा उमेदवारांचा अर्ज रद्द झाल्यानंतर बसपाच्या काही आमदारांनी सपाचे नेते अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. या भेटीवर मायावती चांगल्याच संतापल्या होत्या.
”विधान परिषद निवडणुकीत बसपा जशास तसे उत्तर देण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावेल. एकवेळ भाजपाला मत देऊ वा इतर पक्षाला, पण विधान परिषद निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू. आमच्या सात आमदारांना फोडले गेले. ही गोष्ट समाजवादी पार्टीला महागात पडेल,” असा इशारा मायावती यांनी दिला होता.