मुंबई – उत्तर महाराष्ट्र हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता, आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून 2024 मध्ये कॉंग्रेस स्वबळावर सत्तेत येईल. यासाठी आतापासूनच काम करा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.
गांधी भवन येथे नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी कॉंग्रेस पक्षात घरवापसी केली. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकासमंत्री के. सी, पाडवी व पदाधिकारी उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले, कॉंग्रेस पक्ष हा देशाला तारणारा, सर्व जातिधर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून, भाजपने खोटी स्वप्ने दाखवून देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम केले. आता लोकांचा भाजपावरील विश्वास उडाला असून, कॉंग्रेसचा विचारच देशाच्या हिताचा आहे हे लोकांना पटत आहे.
कॉंग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम केले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र हा कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून 2024 मध्ये कॉंग्रेस स्वबळावर सत्तेत येईल यासाठी काम करा असे, तसे त्यांनी सांगितले.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल उत्तम सुरू असून, कॉंग्रेसला महाराष्ट्रात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांसाठी सर्वजण त्यांच्यासोबत आहेत. भाजपाला कंटाळून अनेक जण कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत असून, आजचा पक्षप्रवेश पाहता धुळे जिल्हा पुन्हा एकदा कॉंग्रेसमय होण्याची सुरुवात झाली असल्याचे चित्र दिसत आहे, असेही थोरात म्हणाले.