नवी दिल्ली – अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी रिटेल क्षेत्र पूर्वपदावर येण्याची गरज आहे. त्यासाठी मॉल, शॉपिंग सेंटर उघडण्याची टप्प्याटप्प्याने परवानगी देण्यात यावी असे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने म्हटले आहे.
बरेच दिवसाच्या निर्बंधामुळे ग्राहकांना खरेदी करायचे राहिलेले आहे. त्यामुळे रिटेल मॉल उघडण्याची परवानगी दिल्यानंतर खरेदी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. संसर्ग होणार नाही अशा पद्धतीने काम चालू ठेवण्याची तयारी मॉल चालकांनी केलेली आहे. अर्थव्यवस्था अधिक बिघडू नये आणि रोजगार घटू नयेत यासाठी हे क्षेत्र शक्य तितक्या लवकर चालू करण्याची गरज आहे.
अन्यथा रोजगार निर्मितीवर मोठा परिणाम होऊ शकतो असे पत्रक या संघटनेने काढले आहे. या संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी सांगितले की, हरियाणाने पुढाकार घेऊन मॉल सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. हरियाणामध्ये सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत मॉल उघडण्यात येतात. त्याचबरोबर 25 वर्ग फूटामध्ये एक ग्राहक अशी मर्यादा घालून दिलेली आहे.
मॉलमध्ये भरपूर जागा आणि खेळती हवा असते. त्यामुळे मॉलमध्ये खरेदी करताना संसर्ग जास्त प्रमाणात होत नाही. इतर राज्यांनी हरियाणाप्रमाणे टप्प्याटप्प्याने मॉल सुरू करण्याची परवानगी देण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.