धान्य वाटप उपक्रम सुरू करण्याची नगरसेवक मोरे यांची मागणी
कात्रज – पुणे शहरांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढविण्यात येऊन ते दि. 3 मे पर्यंत करण्यात आले आहे. तेव्हा आपत्कालीन बाब म्हणून प्रत्येक नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय रकमेतून पाच लाख रुपयांचे धान्य वाटपाची मुभा प्रत्येक नगरसेवकांना देण्यात यावी. तसेच, धान्य वाटपात भ्रष्टाचार आढळल्यास संबंधित नगरसेवकांचे पद रद्द करून पुढील पंचवार्षिकमध्ये त्यास तसेच त्याच्या कुटुंबीयांना निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी तथा सूचना नगरसेवक वसंत मोरे यांनी केली आहे.
कात्रज येथील प्रभाग क्रमांक 40 चे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक मोरे यांनी यासंदर्भातील निवेदन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे लेखी स्वरुपात दिले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या अंदाज पत्रकामध्ये दरवर्षी नगरसेवकांसाठी वॉर्डस्तरीय 20
लाख रुपयांची रक्कम असते. सध्या, लॉकडाऊन मधील पुण्यातील परिस्थिती पाहता शहरांमधील नागरिकांचे अन्नधान्य वाचून हाल सुरू आहे. निम्म्या पुण्यात मध्यमवर्गीय व गरीब नागरिक आहेत. करोना विषाणूच्या संकटामुळे अशा नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा लोकांकरिता उपक्रम राबविणे गरजेचे आहे. यानुसार या उपक्रमासाठी धान्य महानगरपालिकांनी खरेदी करून द्यावे. मनपाच्या मोठमोठ्या जागेमध्ये नगरसेवकांच्या व मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखेखाली वाटप करण्यात यावे, अशी सूचनाही नगरसेवक मोरे यांनी मांडली आहे. आरोग्य विभागात पुणे महानगरपालिका खूप चांगली काम करते आहे. यामुळेच शहरातील परिस्थिती लवकरच आटोक्यात येईल, असे वाटत असतानाच शहरात करोनाचे रुग्ण वाढत आहेत.