विभागीय आयुक्त : अन्नधान्य वाटप सुरू
पुणे – पुणे शहरात 30 आणि पिंपरी चिंचवड येथे करोना संसर्गाचे 6 हॉटस्पॉट आहेत. जसे जसे रुग्ण आढळून येतील, तसे हे हॉटस्पॉट ठरविण्यात येतील व तेथे आणखी कर्फ्यू लावून वर्दळ कमी करण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, “पुणे विभागात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या परप्रांतीय कामगार, ऊसतोडणी कामगार व मजूरांसाठी विविध सामाजिक संस्था, साखर कारखाने व जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवास व भोजनाची व्यवस्था केल्याची माहिती देण्यात आली आहे. सोबतच शासन, कम्युनिटी किचन व सामाजिक संस्थेचे किचन यांच्याद्वारे त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.
शासनाकडून जेव्हा परवानगी मिळेल, तोपर्यंत त्यांना सुरक्षित ठेवण्यात येईल. त्यांना काही अडचण असल्यास वेगवेगळ्या हेल्पलाइन सेवा सुरू केलेल्या आहेत. भाजीपाला, अन्नधान्य या जीवनावश्यक वस्तूंची सोय करण्यात येत आहे. तसेच 95 टक्के रेशनकार्ड धारकांना एप्रिल महिन्याचे अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. माहे मे व जूनचे धान्य वाटपही लवकर करण्याचा प्रयत्न आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार केशरी रेशनकार्ड धारकांना सुद्धा अन्न- धान्य वाटप करण्यात येईल.
ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, अशांना कम्युनिटी किचनमध्ये जेवणाची सोय केलेली आहे. त्यामुळे त्यांना अडचण येणार नाही. तहसीलदार, महसूल अधिकारी, महानगरपालिका चे अधिकारी, पोलीस प्रशासन त्यांना मदत करेल, त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.’