नवी दिल्ली : जगात कोरोनाने हैदोस घातला आहे. दरम्यान, या कोरोनावर उपचारासाठी पॅरासिटेमॉल हे काही प्रमाणात गुणकारी ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पॅरासिटेमॉलवर आधारित अनेक औषधांवरची निर्यातबंदी सरकारने उठवली आहे. मात्र पॅरासिटेमॉल निर्मितीसाठी लागणाऱ्या औषध घटकांवरील निर्यात बंदी मात्र कायम ठेवली असल्याचे परदेशी व्यापार महासंचालकांनी एका अधिसूचनेत म्हटले आहे.
निर्बंधित गटातील कुठलेही औषध किंवा घटक निर्यात करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. आता पॅरासिटेमॉल आधारित औषधांना ही परवानगी लागणार नाही. पॅरासिटेमॉलसाठी लागणाऱ्या औषध घटकांवरील निर्यात बंदी कायम राहणार आहे.
सरकारने ३ मार्च रोजी २६ औषध घटक व औषधांवर निर्यातबंदी लागू केली होती त्यात पॅरासिटेमॉलचा समावेश होता. पण ६ एप्रिल रोजी २४ औषध घटकांवरची निर्यात बंदी उठवण्यात आली, पण त्यात पॅरासिटेमॉलच्या औषध घटकांवरील निर्यात बंदी कायम ठेवण्यात आली होती. भारताने ५.४१ अब्ज डॉलर्सची पॅरासिटेमॉलवर आधारित औषधांची निर्यात २०१९-२० मध्ये केली होती. २०१८-१९ मध्ये ही निर्यात ५.८ अब्ज डॉलर्सची होती. पॅरासिटेमॉलचा उपयोग हा शरीरातील वेदना व ताप कमी करण्यासाठी केला जातो.