नवी दिल्ली – हेनले पासपोर्ट इंडेक्सने जगभरातील सगळ्यांत शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारताला ८० वी रँकिंग दिली आहे. भारताचा पासपोर्ट असणारी व्यक्ती जगातल्या ६२ देशांमध्ये बिना व्हीसा प्रवेश करू शकणार आहे.
त्यामुळे भारतीय प्रवाशांना आता पूर्वीच्या तुलनेत परदेश प्रवास आता अधिक सुकर झाला आहे. जगात गेल्या काही वर्षांत भारताची पत आणि प्रभाव वाढली असल्याच्या दृष्टीकोनातून या घटनेकडे पाहिले जाते आहे.
हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारत आज जगात ८० व्या स्थानावर आहे. भारतीय प्रवासी ज्या ६२ देशांमध्ये बिना व्हीसा प्रवास करू शकतात अशा देशांची संपूर्ण यादीच ११ जानेवारी रोजी जारी करण्यात आली असून त्यात मालदीवचाही समावेश आहे. हेनलेच्या यादीनुसार युरोपीय देश,- फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आणि आशियातील देश जपान आणि सिंगापूर पहिल्या स्थानावर आहेत.
या देशांचा पासपोर्ट सगळ्यांत बलशाली मानला जातो कारण हा पासपोर्ट असणाऱ्या व्यक्ती जगातल्या तब्बल १९४ देशांमध्ये व्हीसामुक्त प्रवेश मिळवू शकतात. त्यामुळे या देशांचा प्रवाशाकडे असलेला पासपोर्ट पुरेसा आहे. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया, स्वीडन आणि फिनलँड या देशांचे नाव येते.
यांचा पासपोर्ट असणारी व्यक्ती १९३ देशांमध्ये बिना व्हीसा प्रवेश मिळवू शकतात तर ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड आणि नेदरलंडचे पासपोर्टधारक १९२ देशांमध्ये बिना व्हीसा प्रवेश मिळवू शकतात. त्यामुळे हेनलेच्या यादीत त्यांना तिसरे स्थान देण्यात आले आहे.