राहाता -तहसीलदार असल्याची बतावणी करीत येथील एका शिक्षण संस्थेत हंगामी शिक्षिका असलेल्या एका महिलेने सात जणांना नोकरी देण्याचे आमिष दाखविले. तसेच त्यांना सुमारे 57 लाख रुपयांना गंडा घातला. याबाबत संबंधितांनी शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याबाबत धीरज प्रताप पाटील (रा. साकुरी, ता. राहाता) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, बिना दिनेश सोनावणे या राहाता येथील एका शाळेत हंगामी शिक्षिका होत्या. त्यांनी मला व माझी पत्नी विद्या यांना शिक्षक सेवकपदाची नोकरी मिळवून देते, असे सांगितले. त्यानंतर सोनावणे यांचे पती दिनेश हे आम्हाला लोणी येथील एका संस्थेच्या कर्मचाऱ्याकडे घेवून गेले.
तेथे गेल्यानंतर या कामसाठी 20 लाख रुपये द्यावे लागतील, असे या कर्मचाऱ्याने सांगितले. सदर रक्कम देण्याचे आम्ही मान्य केले. त्यानंतर 30 जुलै 2014 ते 15 जानेवारी 2019 या कालावधित आम्ही या दाम्पत्याकडे 20 लाख रुपये दिले. त्यातील दोन लाख रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे दिली. प्रत्यक्षात नोकरी मिळाली नाही.
मात्र 5 सप्टेंबरनंतर या दाम्पत्याने त्यांचे फोन बंद केले. तसेच राहाता येथून आपले बिऱ्हाड घेवून गायब झाले, असे तक्रार अर्जात म्हटले आहे.
या महिलेने आपण तहसीलदारपदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची बतावणी करत तलाठ्याची नोकरी लावून देते, असे सांगून अन्य काही व्यक्तींकडून पैसे घेवून त्यांची सुमारे 57 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी आल्या असल्याचे देखील शिर्डी पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणात फसवणूक झालेले तक्रारदार धीरज पाटील यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.