वडगावशेरी, दि. 17 (प्रतिनिधी) -गळ्यात भला मोठा चाबूक…, कमरेला लावलेली कपड्याची माळ आणि त्याच चाबकाने उघड्या अंगावर होत असलेले चाबकाचे फटकारे आता थांबणार आहेत. कारण, हेच हात आता नवा “विक्रम’ करणार आहेत, याच हातातून आता शालेय शिक्षणाचा श्रीगणेशा सुरू होणार आहे. पोतराजांच्या शिक्षणाची जबाबदारी माजी उपमहापौरांनी घेतली आहे.
पोतराजांचे जीवन सर्वसामान्य माणसाला माहीत आहे. गेली पिढ्यान्पिढ्या पोतराज परंपरा सुरू ठेवणाऱ्या रामा निबांळकर यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मुलगा विक्रम यालाही या व्यवसायात उतरविण्याचा निर्णय घेत रामा यांनी त्याला काही धडे दिले. हाच पोतराज असणारा विक्रम वडगावशेरी परिसरात पोतराजाचे वेशात असताना माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचे वडील रामा निबांळकर यांची भेट घेऊन समजूत काढली आणि विक्रम याला या वेशातून बाहेर काढण्याची विनंती करीत त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च करण्याची तयारी दर्शवली, त्याला रामा यांनी लगेच मान्यता दिली. त्यामुळे चाबकाऐवजी आता विक्रमच्या हाती पुस्तक येणार आहे.
व्यवसाय हा पोटाची खळगी भरण्यासाठी असला तरीही शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे. शिक्षण असले तरच माणूस यशस्वी होऊ शकतो. त्यामुळेच पोतराज होऊ पाहणाऱ्या विक्रमला मदतीचा प्रयत्न करीत आहे. शिक्षणाचा सर्व खर्च करणार आहे. – डॉ. सिद्धार्थ धेंडे,
माजी उपमहापौर, पुणे मनपा