भावनगरमध्ये 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
अहमदाबाद – गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी करोनाची बाधा झालेल्या 70 वर्षीय वृद्धाचे निधन झाले. त्यामुळे त्या राज्यात करोनाने घेतलेल्या बळींची संख्या 3 वर पोहोचली आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत 43 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील भावनगरच्या सरकारी रुग्णालयात दाखल असलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. संबंधित व्यक्ती नुकतीच दिल्लीवरून परतली होती. त्या व्यक्तीला हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. करोनाचे बळी ठरलेले गुजरातमधील तिघेही वयोवृद्ध होते. त्यातील 85 वर्षीय महिलेचे बुधवारी अहमदाबादमध्ये निधन झाले.
ती महिला सौदी अरेबियाहून परतली होती. गुजरातमध्ये 22 मार्चला पहिल्या करोना बळीची नोंद झाली. त्यादिवशी सुरतमध्ये एका 67 वर्षीय वृद्धाचे निधन झाले. गुजरातपुरता विचार केल्यास अहमदाबादमध्ये सर्वांधिक 15 करोनाबाधित आढळले आहेत. करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची कठोरपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने यंत्रणा प्रयत्नशील आहेत. विलगीकरणाच्या नियमांचा भंग केल्यावरून आतापर्यंत गुजरातमध्ये 147 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.