मंचर -आंबेगाव तालुक्यातील सुमारे 20 पेट्रोल आणि डिझेल पंप जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद ठेवले असले तरी पेट्रोलपंप मालक आणि कामगार यांच्याशी नागरिक इंधन मिळावे, यासाठी हुज्जत घालत आहे. काहीजण अरेरावी करत असल्याने पेट्रोलपंप चालक त्रस्त झाले आहेत.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा अधिकारी वेगवेगळे निर्णय लोकहितासाठी घेत आहे. हॉटेल, सलुन, दुकाने, पानटपरी, बेकरी आदी व्यवसाय पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवत आहे; परंतु एवढे निर्बंध लादूनही मात्र दुचाकी, चारचाकी गाड्यांवर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. ठिकठिकाणी नागरिक गर्दी करीत आहेत.
विनाकारण वाहनांद्वारे फिरणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांशिवाय इतरांना पेट्रोल देऊ नये, असे आदेश मंगळवारी (दि. 24) सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. त्यानुसार बुधवार (दि. 25) सायंकाळपासून पेट्रोल-डिझेल पंपावर नागरिकांनी इंधन भरण्यासाठी येऊ नये, यासाठी पंपचालक पंपाच्या प्रवेशद्वारांवर दोरी बांधून पंप बंद असल्याचे बोर्ड आहे, तर काही पंपचालकांनी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांशिवाय इतरांना इंधन मिळणार नसल्याचे बोर्ड लिहिले; परंतु काही जण पंपावर इंधन मिळत नाही, असे म्हणून पंपमालक आणि कर्मचाऱ्यांसोबत भांडणे करताना दिसत आहे, तर काही नागरिकांनी अरेरावीची भाषा वापरली आहे, त्यामुळे पंपचालक, कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद विकोपाला जात आहे.
करोना व्हायरसमुळे पेट्रोल, डिझेल पंपावर मिळणार नाही. हा जिल्हा अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय योग्य असून, त्यास नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना इंधन मिळणार आहे. विनाकारण ग्राहकांनी गैरसमज न करता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनास सहकार्य करावे.
– संजय बाणखेले, पेट्रोल पंपचालक, मंचर
पेट्रोल आणि डिझेल पंपावर पुरेसा साठा असून नागरिकांनी विनाकारण पेट्रोल, डिझेल पंपावरील मालक, कर्मचारी यांच्यावर दादागिरी करू नये. अन्यथा संबंधितावर गुन्हा दाखल करावा लागेल.
– कृष्णदेव खराडे,
पोलीस निरिक्षक, मंचर