1500 घरांचे सर्वेक्षण केलेल्या शिक्षकांची सुटका
पुणे – मागील तीन महिन्यांपासून करोना सर्वेक्षणाच्या कामासाठी नेमलेल्या शिक्षकांची अखेर सुटका झाली आहे. ज्या शिक्षकांनी महापालिकेने निश्चित करून दिलेल्या पंधराशे अथवा त्यापेक्षा अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यांना या कामातून कार्यमुक्त करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिले. दरम्यान, ज्या शिक्षकांनी अद्यापही दिलेले उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. त्यांना या आदेशातून वगळले आहे.
शहरात 9 मार्च रोजी पहिला करोनाबाधित आढळून आला. त्यानंतर रुग्ण संख्या वाढतच आहे. त्यामुळे पालिकेने 20 मार्चपासून शहरात घरोघरी जाऊन तसेच करोनाबाधित रुग्ण असलेल्या परिसरात हे सर्वेक्षणाचे काम हाती घेतले होते. सुरुवातीला हे काम आरोग्य विभागाचे कर्मचारी करत होते. त्यानंतर हे काम शिक्षकांना देण्यात आले. त्यासाठी प्रत्येक शिक्षकांना किती घरांचे सर्वेक्षण करायचे हे ठरवून दिले होते. मात्र, त्यातून शिक्षकांना वगळण्याची मागणी संघटनांकडून सातत्याने सुरू होती. संघटनेच्या प्रतिनिधींनी त्यासाठी राजकीय नेत्यांपासून पदाधिकाऱ्यांकडे अनेकवेळा हेलपाटे मारले.
मात्र, प्रशासनाकडून त्यांना दाद दिली नव्हती. आता प्रशासनाने ज्या शिक्षकांनी पंधराशे घरांचे
सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. त्यांना कार्यमुक्त केले आहे. अशा शिक्षकांनी आता शालेय कामांसाठी प्रत्यक्ष शिक्षण विभागाकडे त्यांची नेमणूक केलेल्या जागी रुजू व्हायचे आहे. या निर्णयामुळे जवळपास पंधराशे शिक्षकांची या कामातून सुटका झाली आहे.