वेल्हे – वेल्हे तालुक्यात करोनाचे रुग्ण काही बरे झाले असले तरी नव्या रुग्णांमध्ये भर पडत आहे. करोना तालुक्याची पाठ सोडत नसल्याने करोना नियंत्रात आणण्यासाठी वेल्हे प्रशासन रात्रंदिवस झटत आहे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी वांगणीवाडीचे तरुण गावाच्या वेशीवर 24 तास पहारा देत आहे.
वांगणीवाडीतील सर्व ग्रामस्थांच्या मदतीने गावच्या वेशीवर चेकपोस्ट बसवला आहे. या चेकपोस्टवर सॅनिटाईझर ठेवून गावातून अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना सॅनिटाईझ केल्यानंतरच आत प्रवेश दिला जातो. विशेष म्हणजे या कामासाठी तरुणवर्ग एकवटला आहे. प्रत्येक तरुणाची 24 तास गल्लीनिहाय नेमणूक करण्यात आली आहे.
चेकपोस्टवर ठेवलेल्या वहीत गावात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची नोंद केली जात आहे. पुणे-मुंबई येथून आलेल्या लोकांना शाळेमध्ये किंवा शेतातील घरांमध्ये निवारा बांधून दिला आहे. प्रत्येक जण ज्या झोनमधून आला आहे त्याप्रमाणे स्वतंत्र वेगवेगळे ठेवले जात आहे.