सातारा – पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक व समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये क्रीडा संकुलाच्या विकासासाठी वाढीव निधी, बास्केटबॉल मैदान दुरुस्ती, व्यापारी संकुलासमोरील मोकळ्या जागेचे सुशोभीकरण व वसतिगृह, संरक्षक भिंत रंगकाम करणे यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मल्लांच्या कुस्तीसाठी मातीचा स्वतंत्र आखाडा तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री देसाई यांनी केल्या.
या कार्यक्रमामध्ये हुतात्मा जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांना पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते ताम्रपटाचे वितरण करण्यात आले. पोलीस अधीक्षक समीर शेख व फलटणचे उपअधीक्षक तानाजी बरडे यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक 2021 देण्यात आले. तसेच जिल्हा क्रीडा पुरस्कार, नागपूरच्या महाज्योती संस्थेमार्फत प्राप्त झालेल्या टॅबलेट, डाटा सिम कार्डचे वाटप, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारही श्री. देसाई यांच्या हस्ते देण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिवकालीन साहसी खेळांचे प्रात्यक्षिक, मल्लखांब व लेझीम यांचा समावेश होता. शिवकालीन साहसी खेळाने व मल्लखांब प्रात्यक्षिकाना उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वन विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेकडे असलेल्या विविध योजनांची माहिती जनतेला व्हावी यासाठी चित्ररथ तयार केले होते. हे चित्ररथ प्रजासत्ताकदिनी झालेल्या संचालनाचे मुख्य आकर्षण ठरले.