पुणे -गुरूवारी (दि.26) प्रजासत्ताक दिनाची असलेली सुट्टी आणि उद्या (शनिवार दि. 28) असलेल्या साप्ताहिक सुट्टीमुळे मार्केट यार्डातील कांदा-बटाटा, फळ आणि भाजीपाला विभागात शुक्रवारी (दि. 27) नेहमीच्या तुलनेत मोठी आवक झाली. नेहमीच्या तुलनेत दीडपट आवक झाली. तब्बल 1 हजार 491 गाड्यांमधून 59 हजार 345 क्विंटल शेतीमालाची आवक झाल्याची माहिती बाजार समितीच्या फळ विभागाचे प्रमुख दत्तात्रय कळमकर यांनी दिली.
मार्केट यार्डातील फळ विभागात 458 गाड्यांमधून 8 हजार 923.88 क्विंटल, भाजीपाला विभागात 612 वाहनांमधून 16 हजार 112.25 क्विंटल आणि कांदा-बटाटा विभागात 421 वाहनांमधून 34 हजार 309.20 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. या आवकविषयी ज्येष्ठ आडते विलास भुजबळ म्हणाले, दोन दिवस सुट्टीमुळे मार्केट यार्डात भाज्यांची आवक मोठी झाली.
शुक्रवारी नेहमी जास्त आवक होते. मात्र, नेहमीच्या शुक्रवारच्या तुलनेत दीडपट आवक झाली. (शनिवार) सुट्टीमुळे व्यापाऱ्यांना सर्व माल आजच खपवावा लागला. परिणामी, सर्व प्रकारच्या भाजीच्या भावात घाऊक बाजारात 10 ते 20 टक्क्यांनी घट झाली.