विश्रांतवाडी -“सुरेंद्र पठारे फाउंडेशन’मार्फत आयोजित केले जाणारे रक्तदान महाशिबीर हा एक उपक्रम कौतुकास्पद आहे. विशेषतः करोनाकाळात यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठी मदत झाली. फाउंडेशनने करोनाकाळात इतर कामांद्वारेही उल्लेखनीय योगदान दिले. यासाठी सुरेंद्र पठारे यांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
खराडी येथे “सुरेंद्र पठारे फाउंडेशन’द्वारे आयोजित रक्तदान महाशिबीराचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार बापूसाहेब पठारे, वडगावशेरी मतदारसंघातील माजी नगरसेवक व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्यावतीने यंदा सलग तिसऱ्या वर्षी रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या रक्तदान शिबीराला रक्तदात्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. पहिल्या रक्तदान शिबीरातून विक्रमी 1644 तर दुसऱ्या रक्तदान शिबीरातूनही तब्बल 3453 रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन झाले होते. यंदाचे रक्तदान शिबीर गुरुवारी (दि. 26) प्रजासत्ताक दिनी पार पडले, यातून तब्बल 3593 रक्तपिशव्यांचे संकलन झाले.
रक्तदान हे श्रेष्ठदान असून दरवर्षी रक्तदात्यांचा उत्स्फूर्त आणि विक्रमी सहभाग हे आमचे मनोबल वाढविणारा आहे. या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राची रक्ताची गरज भागविण्यासाठी उल्लेखनीय वाटा उचलू शकलो याचे समाधान आहे.
– सुरेंद्र बापूसाहेब पठारे, सरचिटणीस, भारतीय जनता युवा मोर्चा