मुंबई – निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. यानंतर पक्षावर ताबा मिळविलेल्या शिंदे गटाकडून सोमवारी विधिमंडळातील शिवसेना पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेण्यात आला आहे. तसेच अन्य कार्यालयेही ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने आपला निकाल राखून ठेवला होता. मात्र, 10 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने अचानक निर्णय जाहीर केला. त्यानुसार, शिंदे गटाकडे शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह गेले.
निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर शिंदे गटाने आता शिवसेनेच्या विधिमंडळातील कार्यालयावर ताबा मिळवला आहे. तसेच, राज्यभरातील सर्व कार्यालयांवर ताबा मिळवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर म्हणाले, आम्ही विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतलेला नसून कार्यालयात प्रवेश केला आहे. त्यासाठी आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. हे शिवसेना पक्षाचं कार्यालय आहे आणि आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तयारी केली आहे. कार्यालय ताब्यात घेण्यासाठी आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया भरत गोगावले यांनी पूर्ण केली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.