“सोनू के टीटू की स्वीटी’ आणि “दे दे प्यार दे’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शविली होती. आता निर्माता भूषण कुमार यांनी या चित्रपटांचा सिक्वल काढणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच या चित्रपटांची तयारीही सुरू करण्यात आली आहे.
भूषण कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “सोनू के टीटू की स्वीटी’चा भाग 2 नक्कीच येईल, ही अशी फ्रॅंचायझी आहे जी आम्हाला पुढे घ्यावीशी वाटते. या चित्रपटात कार्तिक आर्यनसह नुसरत भरुचा आणि सनी सिंह यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धम्माल केली होती.
तसेच 2019मध्ये अजय देवगन, तब्बू आणि रकुल प्रीत सिंह यांचा “दे दे प्यार दे’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कॉमेडीसह एक प्रेमकथा होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता आणि चित्रपटाने कमाई देखील चांगली केली होती. याबद्दल भूषण कुमार म्हणाले, या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल लव रंजन यांच्याशी बोलणे झालेले आहे. दरम्यान, भूषण कुमार आणखी एक चित्रपट अजय देवगण याच्यासोबत करत आहे. “भुज – द प्राइड ऑफ इंडिया’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होत आले असून तो प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.