वेल्हे – वेल्हे तालुक्यात सुरुवातीच्या काळातच करोनाच्या संक्रमणामुळे आर्थिक घडी विस्कटली. वेल्ह्यात 21 मार्चला करोना रुग्ण आढळला. त्यानंतर हा आकडा 9 वर गेला, त्यामुळे प्रशासनाने कडक नियमांची अंमलबजावणी केली आणि तालुका करोनामुक्त झाला. असे असले तरी अजूनपर्यंत लॉकडाऊनचे नियम पाळले जात असल्यामुळे कोणालाही सूट दिली गेली नाही. येथील बाजारपेठा पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. या भागात वेल्हे आणि पानशेत अशा दोन मोठ्या बाजारपेठा आहेत. दोनही बाजारपेठांत सोमवार व शुक्रवार आठवड्यातून दोन दिवस बाजार भरतो; परंतु सध्या करोनाचे सावट असल्याने या दोन्ही बाजारपेठा ठप्प आहेत.
पर्यटनावर मोठा परिणाम
वेल्हे तालुका निसर्ग समृध्दीने नटलेला आहे. सह्याद्रीच्या कडकपारीने सजलेल्या तालुक्यात राजगड, तोरणागड, धरणे, धबधब्यांची ठिकाणे, उंच पर्वतरांगा असे वैभव असलेल्या तालुक्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात; परंतु करोनाचा प्रकोप झाला आणि पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल, छोटे छोटे विक्रते, गडांच्या पायथ्याला सरबत, पाणी आणि इतर खाद्य पदार्थ विकणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
दूध व्यावसायिकांचे बजेट कोलमडले
तालुक्यात दूध व्यवसायात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. काही विक्रेते पुण्याला जाऊन दूध घालत आहेत, तर काही ठिकाणी दूध घरीच राहिल्यामुळे फेकून देण्याची वेळ आली आहे. तालुक्यात सुरुवातीपासून संक्रमणाचा धोका निर्माण झाला होता, त्यामुळे दूध विक्रत्यांना क्वारंटाइनमध्येच राहावे लागले. वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट दुधावर अवलंबून असल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ते पूर्ण कोलमडले आहे.