सातारा लोकसभेचे वातावरण कधी नव्हे एवढे तप्त

राजकीय वार्तापत्र 
प्रकाश राजेघाटगे

बुध – सातारा जिल्हा ऐतिहासिक व वीरपुरुषांचा जिल्हा म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. शिवछत्रपतींची तिसरी व त्यानंतर कायम स्वरूपात राहिलेली राजधानी म्हणून सातारा शहराकडे आजही लोक आदराने पाहतात; खास बाब म्हणजे आता या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्वही छत्रपतीचे तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे. गेल्या दोन निवडणुका उदयनराजे मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. पण, चालू 17 व्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून सातारा लोकसभेचे वातावरण कधी नव्हे एवढे तप्त झाले आहे.

सातारा जिल्हा हा तसा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1996 चा अपवाद वगळता येथे कायम कॉंग्रेस विचाराचा व्यक्ती निवडून आलेला आहे. पण 2008-09 च्या दरम्यान उदयनराजे यांनी भूमाता दिंडी, जिल्ह्यातील अनेक प्रश्‍नांना वाचा फोडून लोकसभेचे प्रबळ दावेदार म्हणून समोर आले. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झालेला बदल व तत्कालिन परिस्थिती पाहून शरद पवारांनी उदयनराजे लोकसभेची उमेदवारी उदयनराजे यांनी दिली. राजे पहिल्याच प्रयत्नात तीन लाख मतांनी निवडूनही आले. उदयनराजे यांचे नेतृत्व हे स्वंयभू असल्याने कालांतराने राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व व महाराज यांच्यात कायम बेबनाव राहिला. तरीही शरद पवारांनी 2014 ला राजेनांच उमेदवारी देऊ केली.

आणि विशेष म्हणजे महाराज पावणे चार लाखाच्या मताधिक्‍याने निवडूनही आले. पण गेल्या पाच वर्षात राजे व स्थानिक आमदारांच्या मधील मतभेद ठळकपणे दिसू लागले. जिल्हा परिषद व सातारा नगरपालिका निवडणुकीत महाराजांनी राष्ट्रवादीच्या विरोधात आघाडी करून पक्षाला घरचा आहेर दिला. जिल्हा परिषद फसलेला प्रयोग राजेंनी सातारा नगरपालिका निवडणुकीत यशस्वी करूनही दाखविला; परंतु यामुळे राजेच्या विरोधात पक्षांतर्गत खदखद वाढतच गेली. तरीही पवार साहेबांनी सर्व मतभेद माहुलीच्या संगमावर गंगार्पण करून परत एकदा उमेदवारीची माळ उदयनराजे यांच्याच गळ्यात घातली. वरवर पाहता राजेंना विजयासाठी फार झुंज द्यावी लागेल अशी राजकीय परिस्थिती नाही; परंतु पक्षाचे उमेदवार म्हणून स्थानिक आमदार किती हिरीरीने काम करतात यावर सर्व गणित अवलंबून आहे. जिल्हा कॉंग्रेस पूर्ण ताकदीने राजेंना मदत करत असली तरी राष्ट्रवादीचे काही स्थानिक गट स्वच्छ मनाने व पूर्ण ताकदीने अजूनही प्रचारात सक्रिय नाहीत अशी चर्चा दबक्‍या आवाजात जिल्ह्यात सुरू आहे. ही चर्चा प्रतिस्पर्धी उमेदवाराला फायद्याची आहे हे ओळखून महाराज साहेब अत्यंत सावधपणे पण तितकीच आक्रमणपणे प्रचाराला लागले आहेत.

हे अस्तनीतील निखारे शोधण्यांचे काम राजे पद्धशीरपणे करत आहेत पण हा विरोध वाढत राहिला तर शरद पवार साहेब नामक अग्निशमन बंब ही आग निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात विझवतो ही गोष्ट विसरून चालणार नाही. तुर्तास उदयनराजे यांची लोकसभा एक्‍सप्रेस तुफान दौडत चलो दिल्लीचा नारा देत आहे. सन 2014 ची लोकसभा निवडणुक सर्वार्थाने देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. आघाडी सरकारच्या 10 वर्षाच्या राजवटीला जनतेने उलटून टाकले. 1984 नंतर पहिल्यादाच एकाच पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले. भाजपाचा नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले. पण नंतरच्या सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 25 वर्षापूर्वीची असलेली शिवसेनेबरोबरची युती तोडली.
भाजपाच्या चाणक्‍यांना वाटले मोदी लाटेत महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येईल; परंतु उद्धव ठाकरेंच्या आक्रमक प्रचारामुळे भाजपाचे स्वप्न धुळीस मिळाले.

गेल्या साडे-चार वर्षांत विकासाच्या मुद्द्यावर बॅकफूट गेलेली भाजपा नोटबंदी व जीएसटी अशा वादग्रस्त निर्णयामुळे अजून गोत्यात आली. साहजिकच 2014 प्रमाणे वाटचाल करणे सोपे नसल्यामुळे ऐनवेळी भाजपाने परत एकदा सेनेशी युती केली. पण गेली चार वर्षात सत्तेत असलेल्या शिवसेनेचे संघटन सातारा जिल्ह्यात वाढू शकले नाही; याचे खरे कारण म्हणजे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी पालकमंत्री व संपर्क प्रमुखांच्यावर ठेवलेला फाजील आत्मविश्‍वास आहे. म्हणून तर पक्षप्रमुखांना ऐन निवडणुकीच्या काळात भाजपातून उमेदवार आयात करावा लागला व तसे त्यांनी कोल्हापूरच्या सभेत मान्यही केले.

उमेदवारीसाठी सेनेत आलेले नरेंद्र पाटील (माथाडी नेते) अजूनही भाजपामध्ये असल्यागत दिसत आहेत. कारण त्यांच्या प्रचारयंत्रणेत भाजपाचेच नेते अधिक दिसत आहे. चिन्ह सेनेचे उमेदवार भाजपाचा असे विचित्र चित्र सातारा लोकसभा निवडणुकीत पाहण्यास मिळत आहे. पण यात सर्वात मोठी गोची झाली आहे ती सेनेच्या कट्टर शिवसैनिकांची ! आणि या आगीवर उपाय शोधणारे बंब सद्यःस्थितीस शिवसेनेकडे नाहीत हे खेदाने नमूद करावे लागत आहे. अशा या कठीण परिस्थितीत समोरच्या गोटात चालू असलेल्या फंदफुतुरीचा फायदा होऊ शकतो हे नरेंद्र पाटलांना माहीत आहे; पण यासाठी “प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे’ या संतवचनाचा वापर करावा लागेल; नाहीतर हाता-तोंडाशी आलेला घास फक्त नियोजनातील ढिलाईमुळे दूर जाऊ शकतो.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.