चंद्रपूर – चंद्रपुरात आरोग्य अधिकाऱ्यांनीच कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गेहलोत यांच्या लग्नाचा वाढदिवस येथे धडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी करोना नियंत्रण कक्षातच केक कापण्यात आला. यावेळी तोंडाला मास्क न लावता सोशल डिस्टन्सिंग उल्लंघन करण्यात आले. या व्हायरल झालेल्या फोटोमुळे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाची नाचक्की झाली आहे.
चंद्रपुरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सध्याच्या काळातील संवेदनशील करोना नियंत्रण कक्षात हा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्हाभरातून करोना नियंत्रण आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी याच कक्षातून आदेश जारी होत असतात. याच नियंत्रण कक्षात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गेहलोत यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला.
या कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कक्षाच्या 100 पावले अंतरावर असलेल्या या नियंत्रण कक्षातच अधिकाऱ्यांच्या सूचनांची पायमल्ली झालेली दिसली.
अगदी गाव पातळीपर्यंत नियमांचे पालन झाले पाहिजे यासाठीची यंत्रणा इथूनच कार्यान्वित होते. मात्र, डॉ. गेहलोत आणि त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांनी आमचे कोण काय बिघडवते? असा समज करून घेतल्याचे दिसते.