जुन्नर – सर्वत्र नवरात्री उत्सव सुरू असून शेवंतीसह विविध फुलांना मोठी मागणी होत आहे. आजमितीस मुंबई बाजारात 100 ते 120 प्रतिकिलो पर्यंत बाजारभाव मिळत असून येत्या दसऱ्यापर्यंत आणखीन बाजार वाढतील, अशी माहिती कुसुर येथील युवा शेतकरी सुधीर बोचरे यांनी दिली.
सध्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या कुसुर, वडज, निरगुडे तसेच निमगाव, सावरगाव, गुंजाळवाडी आदी परिसरात शेवंती, गोंडा, बिजली आदी विविध फुलांचे रंगीबिरंगी मळे दिसत आहेत. सध्या मुंबई तसेच इतर शहरांमध्ये विविध जातींच्या शेवंतीला मोठी मागणी येत असून गोंड्यालाही चांगले बाजारभाव मिळत आहेत. ऑक्टोबरमध्ये उष्णता वाढत असल्याने फुले पाठवायला उशीर झाल्यास वजनात घट होण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या दिवसभर फुले तोडणे, ती क्रेटमध्ये भरणे, रात्री उशिरा शहरी बाजारात पाठवणे आणि सकाळी पुन्हा तोड्याला सुरुवात करणे, असाच काहीसा दिनक्रम या शेतकऱ्यांचा सुरू आहे.
160 हेक्टरवर फूलशेती
जुन्नर तालुक्यात सुमारे 160 हेक्टर क्षेत्रावर गोंडा (झेंडू), बिजली, शेवंती, निशिगंध, गुलाब आदी फुलांची लागवड होत असते. आता नवरात्र, दिवाळी, दसरा आदी उत्सव येत असून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हा वर्षभरातील अच्छे दिनाचा काळ असतो. या फुलांना उत्सव काळात चांगले भाव मिळत असले तरी इतर वेळी जेमतेम तोंडमिळवणी होत असल्याचे चित्र आहे.