सातारा -डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षकाला पालक आणि त्याच्या मित्रांनी मंगळवारी मारहाण केली. त्या प्रकरणी आज बुधवारी शिक्षकांनी शाळेच्या आवारात काम बंद आंदोलन केले. परिणामी बुधवारी शाळेचे दैनंदिन कामकाज ठप्प राहिले.
याबाबतची अधिक माहिती अशी, न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतील शिक्षकास एका विद्यार्थ्याच्या पालकाने आणि त्याच्या मित्रांनी किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातून संतप्त पडसाद उमटू लागले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारामध्ये काम बंद आंदोलन करण्यात आले. यामुळे शाळेचे दैनंदिन परिपाठ व तास झाले नाहीत. शाळेत घटनेच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा कमालीची शांतता होती. परंतू विद्यार्थ्यांना अचानक सक्तीची सुट्टी मिळाली.
दरम्यान, आंदोलक शिक्षकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही काल या घटनेबाबत तक्रार दाखल करण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गेलो असता त्याठिकाणी संबंधित शिक्षकांना त्रास होऊ लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले. शिक्षक मारहाणीचा निषेध म्हणून आम्ही आज काम बंद आंदोलन करत आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यादृष्टीने उपाययोजना केल्या जातील.
मारहाणीची घटना घडून 24 तास झाले तरी अद्याप संबंधितांना अटक करण्यात आलेली नाही. चुकीच्या घटनेचा शेवट मारहाणीत होऊ शकत नाही. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांना तात्काळ अटक करावी, अशी आमची मागणी आहे.