सातारा – येथील जिल्हा परिषद मैदानावर सुरू असलेल्या पाच दिवसीय छत्रपती कृषी वाहन व औद्योगिक महोत्सवामध्ये सध्या सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे तो, कर्नाटक येथून आलेला दीड कोटी रुपयांचा आणि तब्बल वीस पुरस्कार मिळविणारा सहा वर्षाचा गजेंद्र रेडा.
कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसुळी येथील विलास गणपती नाईक यांचा सहा वर्षाचा रेडा पंजाबमधून आणलेल्या म्हशीपासून जन्माला आला. ती म्हैस तब्बल एक लाख 40 हजार रुपयांमध्ये आणली होती. त्यानंतर नाईक परिवाराचे भाग्यच बदलले. महाराष्ट्र, कर्नाटक यासारख्या राज्यातील सुमारे वीस हून अधिक प्रदर्शनात लक्षवेधक ठरलेला गजेंद्र नावाचा रेडा महाराष्ट्र, कर्नाटक हिंदकेसरी पुरस्काराने सन्मानित झाला आहे. दररोज 15 लिटर दूध पिणारा, चार किलो पेंड खाणारा तसेच तीन किलो गव्हाचा आटा खाणारा धष्टपुष्ट गजेंद्र दररोज तीन किलो सफरचंदेही खातो बरं का.
ऊस, वैरण, उसाचे वाडे, पाचट यासारख्या खाद्यपदार्थांना स्विकारणारा गजेंद्र सध्या आयशर ट्रकमधून प्रदर्शनासाठी दाखल झाला आहे. नाईक परिवाराकडे सध्या पन्नास म्हशी असून दररोज दीडशे लिटर दूध ते विक्री करतात. स्मार्ट एक्स्पो, सांगली यांच्या सोमनाथ शेटे यांच्याकडून विविध प्रदर्शनात या गजेंद्र रेड्याला आणले जाते. जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी बुधवारी सकाळपासूनच गजेंद्रला पाहण्यासाठी गर्दी केली होती. शेकडो युवकांच्या मोबाईल मध्येही तो आपल्या वेगवेगळ्या पोजेसने कैद झाला आहे. अशा या छत्रपती प्रदर्शनाच्या भेटीवेळी गजेंद्रलाही आपण अवश्य भेटा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.