लक्ष्मीपूजनादिवशी झेंडूच्या फुलांना चांगला भाव; शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण
कराड – दिवाळी सणातील लक्ष्मीपूजनला मोठे महत्त्व आहे. यानिमित्त आपल्या विविध व्यवसाय, उद्योगांच्या ठिकाणी, तसेच घरगुती लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. येथील बाजारपेठेत लक्ष्मीपूजना दिवशी झेंडूच्या फुलांचा दर गगनाला भिडले होते. बळीराजावर लक्ष्मीची कृपा झाल्याचे झेंडूच्या फुलाला सुवर्ण झळाली मिळाल्याचे पाहायला मिळाले.
येथील शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा परिसरात दरवर्षी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची विक्री करण्यासाठी दाखल होतात. यावर्षी दिवाळीमध्ये सलग तीन दिवसांपासून झेंडूच्या फुलांना कमी-जास्त मागणी असल्यास दिसून आले. यामध्ये वसुबारसेला दिवाळीच्या पहिल्या दिवशी झेंडूच्या फुलांना सुमारे 50 ते 60 रुपये प्रति किलो दर मिळाला. तसेच दुसऱ्या दिवशीही साधारण हाच दर कायम राहिला. परंतु, तिसऱ्या व महत्त्वपूर्ण लक्ष्मीपूजनादिवशी बाजारपेठेत झालेली झेंडूची कमी व तसेच वाढती मागणी पाहता झेंडूच्या फुलांचा दर प्रति किलो 100 ते 120 रुपयांपर्यंत वाढला होता. दिवाळीमध्ये लक्ष्मीमाता शेतकऱ्यांवर प्रसन्न झाल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळाले.
नागरिकांनी आपल्या विविध व्यवसाय, उद्योगाच्या ठिकाणी, तसेच घरगुती लक्ष्मीपूजनासाठी मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यासाठी येथील दत्त चौकात मोठी गर्दी केली होती. यावेळी तालुक्याचे विविध गावातून फुल उत्पादक शेतकरी याठिकाणी फुल विक्रीसाठी दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी सुरुवातीला सुमारे 80 रुपये प्रति किलो झेंडूच्या फुलांचा दर असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फुले खरेदी केली. त्यानंतर सायंकाळी चार वाजल्यानंतर फुलांचा हाच दर 100 ते 120 रुपये प्रति किलोपर्यंत गेला. तरीही नागरिकांची फुले खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक केरसुणी व दीपावलीच्या अन्य खरेदीसाठीही गृहिणी व नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाली. शेतकऱ्यांसह व्यापारी, दुकानदार यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले. तर ग्राहकांमध्ये मोठा उत्साह दिसून आले. एकंदरीत, लक्ष्मीपूजनाला बाजारपेठेत उत्साह पाहायला मिळाला.
दुर्गेने रुसवले, लक्ष्मीने हसवले
गणेशोत्सव, नवरात्री तसेच दिवाळी या मोठ्या सणांमध्ये झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे या सणांच्या दृष्टीने शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड करतात. यावर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसऱ्याच्या काळात बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा, तसेच विविध रंगांची आकर्षक फुले खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर फुले अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती. परंतु, ही उणीव भरून काढत दिवाळी सणामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याच फुलांना चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे एकंदरीतच “नवरात्रीत दुर्गेने रुसवले, तर लक्ष्मीपूजनात लक्ष्मीने हसवले’ असे चित्र दिसून आले.