बाजारभाव नसल्याने उत्पादक शेतकरी चिंतेत : उत्पादन खर्चही निघेना
पिंपरी – अधिकमासात फुलांचे भाव गडगडले असून, झेंडूची दहा ते वीस रुपये प्रतिकिलो नीचांकी दराने विक्री होत आहे. तर 20 ते 30 किलो पोत्याची विक्री 50 ते 200 रुपयांना होत आहे. यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी दराने झेंडूची विक्री होत आहे.
काही अपवाद वगळता बहुतांशी सर्वच फुलांची विक्री वीस ते तीस रुपये किलो दराने विक्री होत आहे. फुलांच्या वाहतुकीचा देखील खर्च निघत नसल्याने फूल उत्पादक मात्र चांगलेच अडचणीत आले आहेत.
सण-उत्सवात आणि इतर धार्मिक विधींसाठी झेंडूच्या फुलांचा वापर होत असल्याने चऱ्होली, मोशी, डुडुळगाव या परिसरांतील अनेक शेतकरी भाजीपाल्याच्या जोडीला जोडधंदा म्हणून झेंडूच्या शेतीकडे वळले आहेत.
हमखास नफा मिळवून देणारी हे पीक असल्यामुळे या परिसरात झेंडूचे परंपरागत उत्पादन घेतले जात आहे. या ठिकाणचे शेतकरी पिंपरी, खडकी बाजारात येऊन फुलांची घाऊक, किरकोळ पद्धतीने विक्री करून नफा पदरात पाडून घेतात. तर मावळातील अनेक शेतकरी आता फुलशेतीकडे वळाले आहेत.
सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम, प्रार्थनास्थळांमधील वावर यांवर या फुलशेतीचे गणित अवलंबून असते. दिवाळीपर्यंत करोनाची साथ नियंत्रणात येईल, असा विचार करून शेतकऱ्यांनी जूनमध्ये झेंडूची लागवड केली. मात्र करोनाचा अद्याप झेंडूला चांगला बाजारभाव मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरवर्षी दीड ते दोन एकर जमिनीवर झेंडूची लागवड करतो. पाऊस कमी झाला की फुले पिंपरी-चिंचवडच्या बाजारात विकली जातात. नवरात्रोत्सवापासून दिवाळीपर्यंत झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे चांगला दर मिळून केलेली मेहनत लाभदायी ठरते. या वेळी करोना साथीने झेंडू बाजारात जाईल की नाही, त्याला उठाव मिळेल की नाही, अशी चिंता आहे.
– संजय बोडके, फूल उत्पादक शेतकरी