औरंगाबाद – लॉकडाऊनमध्ये दारुविक्री बंद असल्याने दारु शौकीन आणि तळीरामांची तडफड सुरु आहे. त्याचा फायदा घेऊन ऑनलाईन दारुविक्रीच्या नावाखाली फसवणुकीचा प्रकार भामट्यांनी सुरु केला आहे.
एका वाहिनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या बातमीनुसार एखादा फारच व्यसनी असेल तर तो दारु मिळवण्यासाठी काहीही करू शकतो. त्याचाच फायदा काही भामटे घेत आहेत. त्यांनी फेसबुकवर दारुची ऑनलाईन विक्री आणि होम डिलिव्हर असे पेजेस तयार केले आहेत. तुम्ही पत्ता दिला की ते दारू घरपोच देणार असा दावा केलेला आहे. धक्कादायक म्हणजे या पेजवर त्यांनी फोन नंबरही दिले आहेत. त्यावर फोन केला की तुम्हाला कोणती दारू हवी आहे, ती किती रुपयांना मिळेल हे सांगितले जाते. मात्र पैसे आधी ऑनलाईन ट्रान्फर करा अशी त्यांची अट आहे.
फेसबुकवरील जाहिरातील दिलेल्या नंबरवर फोन लावल्यास सुरुवातील तुम्हाला कोणत्या ब्रॅंण्डची दारु हवी, तुम्हाला किती रुपयांना मिळते, कुठे पाठवायची आहे अशी माहिती समोरून विचारली जाते. आणि त्यानंतर तुम्हाला थोडे जास्त पैसे द्यावे लागतील असे सांगितले जाते. नंतर एकच अट असते तुम्ही पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करा. त्यासाठी तुम्हाला नंबर पाठवतो, असेही समोरून सांगितले जाते. पैसे स्ट्रान्स्फर झाले की दारु घरपोच मिळेल असं फोनवरून सांगितलं जातं.
जाहिरातीत दिलेल्या फोनवर बोलल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे समोरची व्यक्ती आधी पैसे टाका, मग दारु पाठवतो असं सांगते. म्हणजे एखाद्याने पैसे भरले की त्याची फसवणूक होणार हे स्पष्ट आहे. दारुसाठी रोज अनेक लोक या ऑनलाईन जाळ्यात फसत असतील. त्यामुळे वेळीच यात लक्ष घालणे आवश्यक आहे. कारण अशा प्रकारात फसवणूक झालेली व्यक्ती तक्रार करायला पुढे येणार नाही व त्यामुळे भामट्यांचे उद्योग राजरोस सुरू राहतील.