नियोजित किलोमीटर गाठताना “पीएमपी’ची दमछाक

पाच वर्षांतील धाव ः निश्‍चित केलेल्या अंतरापेक्षा सरसरी 18.89 टक्‍के
अंतर कमी
पिंपरी – प्रशासनाने निश्‍चित केलेले अंतर कापताना “पीएमपी’च्या बसेसची दमछाक होताना दिसत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसमार्फत वेळापत्रकानुसार नियोजित किलोमीटरच्या तुलनेत (ठरलेली धाव) प्रत्यक्ष पूर्ण केलेले किलोमीटरचे अंतर हे 18.89 टक्‍क्‍याने कमी आहे. गेल्या पाच वर्षांतील ही स्थिती आहे. पीएमपीएमएलने त्यांच्या नियोजनानुसार प्रत्यक्ष धाव पूर्ण केल्यास प्रवाशांना वेळेवर बसेस उपलब्ध होतील. प्रवासी संख्या वाढेल. तसेच, तिकीटाच्या उत्पन्नात वाढ होऊन संचलन तूट कमी होण्यास मदत होईल, असे मत महापालिकेच्या लेखा परीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.

लेखापरीक्षण अहवालात पीएमपीएमएलच्या 2013-14 ते 2017-18 अशा पाच वर्षांच्या कालावधीत वेळापत्रकानुसार ठरलेली धाव आणि प्रत्यक्ष साध्य धाव यांचा तौलानिक आढावा देण्यात आला आहे. या आढाव्यानुसार टक्केवारीत हे प्रमाण उतरत्या आणि चढत्या क्रमानुसार राहिले आहे. 2013-14 मध्ये हे प्रमाण 20.19 टक्के होते. वर्ष 2014-15 : 18.79 टक्के, 2015-16 : 17.29 टक्के, 2016-17 : 19.01 टक्के आणि 2017-18 : 19.19 टक्के असे हे प्रमाण होते.

प्रवासी संख्येत, उत्पन्नात चढ-उतार
पीएमपीएमएलच्या प्रवासी संख्येत 2013-14 ते 2017-18 या पाच वर्षांमध्ये भरीव वाढ झालेली नाही. तसेच, उत्पन्नाचा आलेखही खालावतच राहिला आहे. पीएमपीएमएलची 2013-14 मध्ये प्रति दिन प्रवासी संख्या 10 लाख 64 हजार 94 इतकी होती. 2014-15 मध्ये या प्रवासी संख्येत तब्बल दोन लाखाने वाढ झाली. तेव्हा प्रति दिन प्रवासी संख्या 12 लाख 17 हजार 417 इतकी झाली होती. मात्र, 2015-16 पासून पुन्हा उतरता क्रम सुरू झाला. 2015-16 मध्ये 11 लाख 24 हजार 328, 2016-17 मध्ये 10 लाख 79 हजार 223 आणि 2017-18 मध्ये प्रति दिन प्रवासी संख्या 10 लाख 89 हजार 208 इतकी राहिली. पीएमपीएमपीएलला प्रति प्रवासी मिळालेल्या उत्पन्नातही चढ-उतार पाहण्यास मिळाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.