ब्रेक निकामी, “पीएमपी’ खांबाला धडकली

पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसची पडझड थांबायचे नाव घेत नसून दिवसागणिक पीएमपीचे लक्तरे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावर बघायला मिळत आहेत. “पीएमपी’चा हा करंटेपणा प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतो, एवढीही काळजी घेतली जात नसल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. पीएमपी बसचे ब्रेक निकामी झाल्याने पीएमपीची बस औंध जिल्हा रुग्णालयासमोर खांबाला जाऊन धडकली. दुर्घटनेनंतर बसची अवस्था पाहता “पीएमपी’ची बस आहे की प्रवाशांचे जीव धोक्‍यात घालणारे साधन? असा प्रश्‍न निर्माण
होत आहे.

ब्रेकडाऊन आणि आयुर्मान संपलेल्या बसेसवर कारभार चालवणाऱ्या पीएमपीची एक बस जाऊन थेट खांबाला धडकल्यामुळे आत बसलेल्या प्रवाशांचे धाबे दणाणले. स्वारगेट आगाराची एक बस प्रवाशांना घेवून सांगवी साठी निघाली होती. मात्र, औंध जिल्हा रुग्णालयासमोरील बीआरटी मार्गावर बसचा ब्रेक निकामी झाल्याने येथील खांबावर धडकली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे त्या प्रवाशांचे नशीबच म्हणावे लागेल.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे अक्षरशः तीन तेरा वाजले आहेत. दिवसेंदिवस पीएमपीची सेवा प्रवाशांसाठी सेवा नाहीतर एक अडचण झाली आहे. सततचे ब्रेकडाऊन, पीएमपीच्या थांब्याची दुरावस्थ्या यामुळे प्रवासी हैराण झाले असून त्यात आता ब्रेक निकामी होऊन अपघाताची सुद्धा भर पडत असल्याने आता प्रवाशांचा पीएमपीएमएलवर विश्‍वास संपत चालला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)