नगर – मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून दुबईहून मुंबईत तीन अतिरेकी घुसल्याची खोटी माहिती देणाऱ्यास नगरमधून दहशतवादी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. यासीन याकुब सय्यद (वय 46, रा. भवानीनगर, बुरूडगाव, नगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दहशतवादी विरोधी पथकाने शुक्रवार सकाळी अकरा वाजता ताब्यात घेतले. दहशतवादी विरोधी पथकाने यासीन सय्यद याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात यासंदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यात पुढील चौकशी होणार आहे.
यासीन याने मुंबई पोलीस दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दि.7 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता दक्ष नागरिक बूथवर फोन करून मुंबईत दुबईवरून तीन अतिरेकी येत असल्याचे कळवले होते. या तिघांचा पाकिस्तानशी संबंध आहे. दक्ष नागरिक बूथवरील फोनच्या कॉलर आयडीवर मुंबई पोलिसांना राजा ठोंगे असे नाव दिसत होते. फोनचे लोकेशन हे पुणे सांगून यासीन याने फोन केला होता. ते नंतर तपासात उघड झाले. यासीन याने फोनमध्ये हे तीन अतिरेकी असून, त्यातील मुजीब मुस्तफा सय्यद याचा मोबाईल आणि वाहन क्रमांक दिले होता. या तिघांचे दोन नंबरचे व्यवसाय आहेत, असेही फोनवर सांगितले होते
यानंतर पोलीस महासंचालकांनी या फोनची गांभीर्याने दखल घेत दहशतवादी विरोधी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. महाराष्ट्र, नाशिक आणि नगरमधील दहशतवादी विरोधी पथकाने सयुंक्त कारवाईला सुरूवात केली. याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती. दरम्यानच्या काळात या फोनचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. यासीनने फोनवर दिलेल्या माहितीचीही शहानिशा करण्यात आली. त्यात काही तथ्य आढळले नाही.
गोपनीय तपासात अनेक बाबी उघडकीस आल्या. हा फोन ,नगर मधील रहिवाशी यासीन याने नाव बदलून केल्याचे पुढे आले. त्याने ज्याच्या नावाने तक्रारी केली होती, तो मुजीब मुस्तफा सय्यद हा त्याचा चुलत भाऊ निघाला. यासीन याने हा गुन्हा करताना मागे कोणताच पुरावा राहू नये याची काळजी घेतली होती. परंतु दहशतवादी विरोधी पथकाने तपासात कौशल्य दाखवत गुन्ह्याची उकल केली.
दुसऱ्यासाठी खड्डा खोदला अन् स्वत:फसला
मुजीब आणि यासीनमध्ये नगरमधील भवानीनगर येथे असलेल्या साडेपाच गुंठ्याच्या जमिनीवरून वाद होते. ही जमीन वडिलोपार्जित आहे. त्यातून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. मुजीब आणि त्यांच्या कुटुंब्यांना धडा शिकवण्यासाठी तसेच पोलिसांचा त्रास व्हावा, यासाठी यासीन याने हा खोटा फोन केल्याचे दहशतवादी विरोधी पथकाच्या तपासात पुढे आले. यासीन याच्याकडे पथकाने केलेल्या चौकशीत देखील त्याने कबुली दिली आहे. दुसऱ्यासाठी खड्डा खोदला अन् त्यात तो स्वत: फसला.