अहमदाबाद :– गुजरातची जनता दूरदर्शी आहे. ती प्रत्येकाचेच ऐकून घेते. मात्र, खरे तेच स्वीकारते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी म्हटले.
गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. मोदींनीही अहमदाबादमधील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या मतदानात उत्साहाने सहभागी झाल्याबददल गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील जनतेचे मी आभार मानतो. तसेच, प्रभावीपणे निवडणुका घेत असल्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे अभिनंदन करतो. निवडणूक प्रक्रियेमुळे संपूर्ण जगात देशाच्या लोकशाहीची प्रतिष्ठा वाढत आहे, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अहमदाबादमध्ये मतदान केले. त्यांनी मतदानाच्या माध्यमातून गुजरातचे विकासाचे मॉडेल आणखी मजबूत करण्याचे आवाहन जनतेला केले.