पुणे – सिंहगड रस्त्यावर पानमळा वसाहत येथील आम्रपाली बुद्ध विहारासमोर असलेले ड्रेनेज वारंवार तुंबत असल्याने त्यातून थेट मैलाच रस्त्यावर येत होते. हा प्रकार दैनिक प्रभातने समोर आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाकडून या ड्रेणेजची जंबो जेटींग मशिन द्वारे तब्बल तीन ते चार तास सफाई करत पाण्याचा निचरा करण्यात आला.
सोमवारी सकाळी हे काम करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली. तसेच नागरिकांच्या प्रश्नाची दखल घेतल्याबाबत नागरिकांकडून दैनिक प्रभातचे आभारही मानण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणचे ड्रेनेज सकाळी-सायंकाळी तुंबत होते, त्यामुळे त्यातील मैला थेट बाहेर येऊन तो पाण्यासोबत मुख्य सिंहगड रस्त्यावर वाहत होता.
या ठिकाणी नागरिक वाहने पार्क करतात. तर वसाहतीत जागा नसल्याने अनेक लहान मुले-नागरिक या रस्त्याच्या कडेला असलेल्या रिकाम्या जागेत येऊन थांबतात. मात्र, या पाण्यामुळे या भागात डासांचा प्रादूर्भाव वाढला असून दुर्गंधीने नागरिकांना जगणेही कठीण झाले होते.
त्यामुळे माजी नगरसेवक राहूल तुपेरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय तसेच महापालिकेच्या घनकचरा आणि ड्रेनेज विभागाशी संपर्क साधला आहे. मात्र, या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात होते. मात्र, दैनिक प्रभातने नागरिकांच्या या गैरसोयीला वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने सोमवारी तत्काळ या भागातील ड्रेणेजची सफाई करत नागरिकांना दिलासा दिला आहे.