पुणे- मागील चार दिवसांपासून शहरातील बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. दररोज तब्बल 1800 ते 2000 पर्यंत जाणारी बाधित संख्या आता 1100 ते 1200च्या आसपास आहे. त्यामुळे काहीसा दिलासा आहे.
मात्र, करोनामुळे सुरू असलेला मृत्युचा कहर कमी करण्यात प्रशासनाला अद्याप यश येत नाही. गेल्या 24 तासांत आणखी 69 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक मृत्यू संख्या असून, त्यामध्ये पुणे शहर हद्दीतील 43 तर ग्रामीण व अन्य जिल्ह्यातील 26 जणांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या 3 हजार 571वर पोहचली आहे.
ऑगस्ट अखेरपर्यंत शहरात करोनामुळे दररोज मृत्यू होण्याचे प्रमाण सरासरी 25 ते 30 इतके होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात बाधित संख्येबरोबरच मृत्युचा कहर वाढू लागला. 1 सप्टेंबरला शहरात 2 हजार 332 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. तर आज मृत्युची एकूण संख्या 3 हजार 571 वर जाऊन पोहचली आहे. महिन्याभरात तब्बल 1 हजार 239 जणांचा मृत्युची नोंद झाली आहे.
दरम्यान, आज दिवसभरात 5 हजार 724 जणांची नमुने तपासणी करण्यात आली. शहरातील बाधितांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 351वर पोहचली आहे. दिवसभरात 1 हजार 209 बाधित करोनामुक्त झाले आहे. सध्या, 16 हजार 141 बाधित सक्रीय असून, त्यातील 910 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामध्ये 508 बाधित व्हेंटिलेटरवर आहेत तर 402 बाधित अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. 3 हजार 77 जणांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे.