पुणे- रेस्टॉरंट, हॉटेल्स सुरू करण्याला परवानगी देण्यात आली असली तरी केवळ 50 टक्केच क्षमतेने सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरूवारी काढले आहेत. यामुळे ही परवानगी म्हणजे व्यावसायिकांना अर्धपोटी ठेवण्याप्रमाणेच असल्याची चर्चा आहे.
राज्य सरकारने हॉटेल, रॅस्टोरंट पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी शहरातील करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने मात्र ते 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी त्या- त्या महापालिका क्षेत्रातील करोनाच्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. केंद्र आणि राज्याने अनेक गोष्टींमध्ये शिथीलता दिली आहे.
परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने त्यांचे निर्देश जारी केले आहेत. सुरक्षेच्या नियमांचे बंधनयामध्ये असणार आहे. मास्क, फिजीकल डिस्टन्स, निर्जंतुकीकरण, गर्दी या संबंधीच्या अटी असून नयमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
… नाट्यगृह, चित्रपटगृह बंदच
लग्न समारंभांना 20 जणांना परवानगी होती. आता, 50 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे तर अंत्यविधीवेळी केवळ 20 लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था, जिम, उद्याने, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, खेळाची मैदाने आदी बंदच राहणार असल्याचे पालिकेच्या आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.