रविवारी दिवसभरात 72 नवीन रुग्णांची नोंद
पुणे – पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आता थोडी कमी होताना दिसते आहे. आज दिवसभरात 72 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
दि. 23 एप्रिल रोजी शहरात तब्बल 104 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आणि प्रशासनाची चिंता अधिक वाढली. सलग दुसऱ्या दिवशीही एवढ्याच संख्येने पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे आता पुण्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, दोन दिवसांपासून ही संख्या कमी होताना दिसत आहे. दि. 25 रोजी 90 आढळून आले होते. पण आज ही संख्या 72वर आली. शहरातील बाधितांची एकूण संख्या 1 हजार 142 झाली असून, मृतांची संख्या 76 वर पोहचली आहे.
सद्यस्थितीत शहरातील विविध रुग्णालयात एकूण 768 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 44 जणांची प्रकृती गंभीर असून, ससून रुग्णालयात 28, भारती हॉस्पिटल-7, सिम्बॉयसिस 56, जहांगीर 2, कर्वेरोड येथील सह्याद्री रुग्णालयात 1 रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, आजपर्यंत 165 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 7 हजार 230 जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील 6 हजार 105 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 948 जणांना विलागीकरण कक्षात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
राज्यातील संख्या 8 हजारांवर
राज्यात गेल्या 24 तासांत एकूण 440 नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 8 हजार 68 इतकी झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 19 जण करोनामुळे मरण पावले.
शहरात 4 पोलीस कर्मचारी करोनाबाधित
करोनाविषाणूचा शहरात कहर सुरू असतानाच आता पोलिसांनाही त्याची लागण झाली आहे. शहरातील मध्य वस्तीतील एका पोलीस ठाण्यांमधील 4 कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. गेल्या आठवड्यात या पोलीस ठाण्यामधील एका वाहनचालकाला सुरुवातीला ताप, सर्दी झाल्याने त्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याला करोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर त्याच्या पत्नीलाही करोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. पोलीस ठाण्यातील या कर्मचाऱ्याच्या संपर्कात असलेल्या सर्वांचीच तपासणी करण्यात आली. तेव्हा आणखी दोन पोलीस कर्मचारी बाधित असल्याचे आढळून आले. शनिवारी रात्री आणखी एका कर्मचाऱ्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली.