नवीन 812 रुग्णांची भर; 22 जणांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांनी आज 76 हजारांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत नवीन 812 रुग्णांची भर पडली आहे. तर 22 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकुण मृतांचा आकडा 1754 इतका झाला आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार आज (रविवारी) चार वाजेपर्यंत शहरातील 812 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर सलग दोन दिवस शहराबाहेरील एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. तसेच गेल्या 24 तासांमध्ये 22 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामध्ये शहरातील 15 व शहराबाहेरील 7 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 76,079 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये 5730 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 985 रुग्णांचाही समावेश आहे.
आज मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील भोसरी, पिंपरी, दिघी, निगडी, वाल्हेकरवाडी, चऱ्होली, सांगवी, संत तुकारामनगर, चिखली येथील 15 रुग्णांचा समावेश आहे. तर शहराबाहेरील चाकण, जुन्नर, खेड, येरवडा, वेल्हे, येथील 7 जणांचा समावेश आहे. आज दिवसभरात 914 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 67,296 इतकी झाली आहे.
तर दिवसभरात 3618 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी 2275 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.