सासवड -पुरंदर तालुक्यातील करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची धावपळ अद्याप सुरूच आहे. रविवारी (दि. 27) त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईत सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. करोनामुळे जर्जर झालेल्या पुरंदर तालुक्याची सर्व परिस्थिती पवारांच्या निदर्शनास आणून देत करावयाच्या उपाययोजनासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली. पवार यांनी याबाबत तात्काळ सर्व संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकारी यांना दूरध्वनी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
या भेटीबाबत शिवतारे म्हणाले, सासवड येथील प्रशासकीय इमारतीत स्वच्छता, वीज आणि पाणी यासारख्या सुविधा ताबडतोब करून तिथे कोविड सेंटर करण्याबाबत पवारांना विनंती केली. त्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांना पवार यांनी तात्काळ सूचना दिल्या. नीरा मार्केट कमिटीचा सासवड येथील बाजार सध्या करोनामुळे दिवे येथील क्रीडा संकुलाच्या जागेवर स्थलांतरित करावा आणि सासवड व जेजुरी ग्रामीण रुग्णालयांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून द्यावेत, रुग्णांना रुग्णवाहिका वेळेवर मिळाव्यात, अशा विविध मागण्या केल्या होत्या.
नीरा मार्केट कमिटीचा सासवड येथील घाऊक बाजार कायमस्वरूपी दिवे येथे उभारण्यासाठीच्या प्रस्तावास मी राज्यमंत्री असताना मंजुरी घेतलेली आहे; परंतु जागा हस्तांतरणासाठी महसूल विभागाने मार्केट कमिटीकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली होती. मार्केट कमिटी आर्थिकदृष्ट्या फारशी सक्षम नसल्याने ही जागा नाममात्र दरात द्यावी, अशी मागणी पवारांकडे केली असता याबाबत त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना ताबडतोब तशा सूचना दिल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
“गुंजवणी’च्या निधीत कपात न करण्याची मागणी
गुंजवणी या आपल्या ड्रीम प्रकल्पाचे काम जोरात सुरु आहे. त्याच्या निधीमध्ये करोनामुळे कपात करू नये आणि प्रकल्पाला सहकार्य करावे, अशी मागणीही यावेळी शिवतारे यांनी पवार यांच्याकडे केली. दरम्यान, शिवतारे यांचे आगमन होताच पवार यांनी आस्थेवाईकपणे त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. शिवतारे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतल्यानंतर त्यांनी विविध कामांबाबत सर्व संबंधितांना फोनाफोनीही केल्याची माहिती शिवतारे यांचे स्वीय सहायक माणिक निंबाळकर यांनी दिली.