पॅरिस -करोना फैलावामुळे जगभरात निर्माण झालेले संकट ओसरण्याची चिन्हे अद्याप नाहीत. त्या विषाणूची बाधा जगभरात 44 लाखांहून अधिक रूग्णांना झाली आहे. तर बळींची संख्या 3 लाखांच्या घरात पोहचली आहे.
जगातील 213 देश आणि प्रदेशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. त्यामुळे उद्भवलेल्या जागतिक साथीचा सर्वांधिक फटका अमेरिकेला बसला आहे. त्या देशातील बाधितांची संख्या 14 लाखांपेक्षा अधिक आहे. ते प्रमाण जगातील बाधितांच्या एक-तृतीयांश इतके आहे. अमेरिकेत करोनाबळींच्या संख्येने 85 हजारांचा टप्पा पार केला आहे. त्याखालोखाल ब्रिटन आणि इटलीत अनुक्रमे 33 हजार आणि 31 हजार रूग्ण दगावले आहेत. स्पेन आणि फ्रान्समध्ये प्रत्येकी 27 हजार मृतांची नोंद झाली आहे. ब्राझीलमध्ये करोनाने 13 हजारांहून अधिक बाधितांचा बळी घेतला आहे.
आता रशियात करोना फैलावाने चिंताजनक पातळी गाठली आहे. त्या देशात आतापर्यंत 2 हजार 300 हून अधिक रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत. तेथील जीवितहानीचे प्रमाण कमी असले तरी बाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे.
रशियात अडीच लाखहून अधिक करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे बाधितांच्या संख्येत रशिया जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. रशियापेक्षा केवळ अमेरिका आणि स्पेन या दोन देशांतच अधिक करोनाबाधित आहेत. स्पेनमधील बाधितांची संख्या पावणे तीन लाखांच्या घरात आहे.