इस्लामाबाद – पाकिस्तानातील करोनाबाधितांची संख्या 2708 इतकी झाली आहे. हा कालचा म्हणजे शुक्रवारचा आकडा आहे. सर्वाधिक बाधा पंजाब प्रांतात झाली असून तेथील करोनाबाधितांची संख्या एक हजारावर गेली आहे. त्या देशात आत्तापर्यंत करोनामुळे चाळीस जणांचा मृत्यू झाला आहे.
सरकारने या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न हाती घेतले आहेत. त्यांनी जमावबंदी आदेश ठिकठिकाणी लागू केले आहेत. मात्र, संपूर्ण देशात कोठेही टाळेबंदी पुकारण्यात आलेली नाही. टाळेबंदीचा खेळ आम्हाला परवडणार नाही, असे पंतप्रधान इम्रान खान यांनी या आधीच स्पष्ट केले आहे.
करोनाशी झुंज देण्यासाठी जागतिक बॅंकेने कालच पाकिस्तानला दोनशे दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी बांधकाम क्षेत्रासाठी शुक्रवारी मोठ्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे.