वॉशिंग्टन, इस्लामाबाद, – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला तात्काळ मदतीसाठी १.१ अब्ज डॉलरचे पॅकेज मंजूर केले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानला आपल्या अर्थकारणाची गाडी रुळावर आणण्यासाठी मोठ्या कठोर उपाययोजना स्वीकाराव्या लागतील, असेही नाणेनिधीने म्हटले आहे. (IMF approves final USD 1.1 bn tranche for Pakistan’s bailout package)
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या हंगामी तरतूदींच्या आधारे पाकिस्तानातील आर्थिक सुधारणा कार्यक्रमांचा आढावा नाणेनिधीच्या संचालक मंडळाकडून घेण्याची दुसरी आणि अखेरची फेरी गेल्या आठवड्यात पूर्ण झाली. त्यानंतर ही आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. नाणेनिधीकडून पाकिस्तानला देण्यात आलेल्या हंगामी आर्थिक मदतीचा आकडा आता ३ अब्ज डॉलर इतका झाला आहे.
सर्व मंडळ सदस्यांनी शेवटचा हप्ता जाहीर करण्यास अनुकूलता दर्शविली. भारतीय प्रतिनिधी मात्र मतदानापासून दूर राहिले.
पाकिस्तानने या आर्थिक मदतीचा उपयोग आपल्या आर्थिक नियोजनासाठी करावा. राजकीय स्थिरता, सध्याचे नियोजन जपावे, लघु आर्थिक धोरणाची अंमलबजावणी करावी आणि संरचनात्मक सुधारणा घडवून आणून स्थायी विकास करावा, अशी अपेक्षा नाणेनिधीचे डेप्युटी व्यवस्थापकीय संचालक ऍन्टोनिएट सायेह यांनी व्यक्त केली.
पाकिस्तानला दीर्घकालीन मदतीच्या पॅकेजच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यासाठी नाणेनिधीचे पथक मे महिन्यात पाकिस्तानला जाणार आहे. त्यावेळी ६ अब्ज डॉलर ऐवजी ८ अब्ज डॉलरच्या प्रस्तावावर विचार केला जाणार आहे. तथापि, प्रमुख आराखड्यांवर एकमत झाल्यानंतरच निश्चित आकडा आणि पुरवठा, परतफेडीचा कालावधी निश्चित केला जाईल.