न्युयॉर्क : ब्रिटनमध्ये सध्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे तिथे दहशत निर्माण झाली आहे. मात्र करोनावर तयार करण्यात आलेल्या लस उपयोगी ठरतील का याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान, यावर आता करोनावर लस निर्मिती करणाऱ्या अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्नाने माहिती दिली आहे. आपली लस सुरक्षा प्रदान करेल असा विश्वास मॉडर्नाने व्यक्त केली आहे. एका आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
मॉडर्ना आयएनसीने याविषयी माहिती देताना म्हटले, ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोविड-19 विषाणूपासून आमची लस रोगप्रतिकारशक्ती वाढवेल अशी आम्हाला आशा आहे. करोनाच्या कोणत्याही नव्या विषाणूशी लढण्याची क्षमता तपासण्याची वेगळी चाचणी करण्याचाही कंपनीचा विचार आहे. करोनाचा नवा विषाणू आढळून आल्यानंतर इंग्लंडमध्ये कडक करोना प्रतिबंधक लावण्याचा विचार असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले होते, त्यानंतर मॉडर्नाने यासंदर्भात भाष्य केले आहे.
Moderna expects that the immunity induced by its COVID-19 vaccine would be protective against coronavirus variants reported in the United Kingdom: Reuters
— ANI (@ANI) December 24, 2020
करोनाच्या साथीचा उद्रेक झाल्यापासून उद्भवलेल्या SARS-CoV-2 विषाणूच्या पूर्वीच्या असंख्य प्रकारांविरूद्ध आम्ही प्राण्यांवर आणि मानवावर यापूर्वीच चाचणी केली आहे, या चाचणीमध्येही आमची लस तितकीच प्रभावी राहिली आहे, असा दावा मॉडर्नाने केला आहे.
आमच्या अपेक्षापूर्तीसाठी येत्या आठवड्यांमध्ये आम्ही लसीच्या आणखी चाचण्या घेणार आहोत, असेही अमेरिकन फार्मा कंपनी मॉडर्नाने स्पष्ट केले आहे.