वॉशिंग्टन – अमेरिका आणि ब्रिटनने आज येमेनमधील हौथींच्या ताब्यात असलेल्या भूभागावर जोरदार हवाई हल्ले केले. गेल्या १० दिवसात अमेरिका, ब्रिटनने केलेला हा आठवा हल्ला होता. सोमवारी देखील या दोन्ही देशांनी हौथी बंडखोरांशी संबंधित ८ ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते, असे संयुक्त निवेदनामध्ये म्हटले आहे. या दोन्ही देशांनी प्रत्यक्ष हवाई हल्ले केले. तर कॅनडा, नेदरलॅन्ड, बहारीन आणि ऑस्ट्रेलियाने या हल्ल्यांना मदत पुरवली होती.
काल आणि आज झालेले हल्ले तुलनेने अध्क यशस्वी झाले होते. या हल्ल्यात हौथींची क्षेपणास्त्रे, शस्त्रे, स्फोटकांची गोदामे आणि ड्रोन यंत्रणा नष्ट केली गेली होती, असे सैन्याच्या वरिष्ठ अधिकार् यांनी म्हटले आहे. या हल्ल्यांनी अपेक्षित यश मिळवले असले तरी ११ जानेवारीला केलेला पहिला संयुक्त हल्ला अधिक प्रभावी होता.
त्यावेळी हौथींच्या ३० ठिकाणांवर हल्ला केला गेला होता. येमनमधील हौथींच्या ताब्यातील ठिकाणांवरील लष्करी कारवाईला अमेरिकेने ऑपरेशन पोसेडॉन आर्चर असे नाव दिले आहे. काल केलेल्या हल्ल्यामध्ये हौथींची भूमिगत गोदामे, क्षेपणास्त्र सुविधा केंद्र आणि हवाई निरीक्षक केंद्रांना लक्ष्य केले गेले. या हल्ल्यांच्यावेळी अमेरिकेने यूएसएस ड्वाइट डी. इसेनहॉवर लढाऊ विमानांचा वापर केला.
तसेच ८ लक्ष्यांवर मारा करण्यासाठी युद्धनौका आणि पाणबुड्यांचाही वापर केला गेला. टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांसह सुमारे २५ ते ३० अचूक गायडेड क्षेपणास्त्रे लक्ष्यांवर डागण्यात आली, असेही वरिष्ठ लष्करी अधिकार् याने सांगितले. तसेच चार ब्रिटिश टायफून लढाऊ विमानांनी हौथी लक्ष्यांवर केलेल्या हल्ल्यात भाग घेतला होता, असे ब्रिटनचे संरक्षण मंत्री ग्रँट शॅप्स यांनी सांगितले.
दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी लाल समुद्रातील सुरक्षेसह अन्य महत्वाच्या विषयांवर चर्चा केली, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. लाल समुद्रातील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी हौथी बंडखोरांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा इशारा दिला असल्याचेही व्हाईट हाऊसने म्हटले आहे.