नवी दिल्ली : देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकारण एकूणच ढवळून निघाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा बहुमताने निवडून येत नवा इतिहास निर्माण केला आहे. दरम्यान, त्यांच्या विजयानंतर आता त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे.
येत्या २५ मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. लखनऊ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियममध्ये २५ मार्च, शुक्रवारी दुपारी ४ वाजता हा सोहळा होणार आहे.
स्टेडियममध्ये ५० हजार जण बसू शकतील एवढी क्षमता असून, याशिवाय सुमारे २०० व्हीव्हीआयपींसाठी स्टेडियममध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याशिवाय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांसह इतर प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मागील काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि सपाने भाजपाविरोधात रान उठवले होते. मात्र, त्याचा परिणाम मतदारांवर झाला नसल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे.