कापूरहोळ -येथे पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत पनवेल-मुंबई येथील नाना प्रधान यांच्या तेजा-पॉवर या बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावला आहे. ही शर्यत पुणे सातारा महामार्गलगत वीर धाराऊ माता यांच्या पावन भूमीत कापूरहोळ येथे असल्याने महामार्ग रस्त्याच्या दुतर्फा शर्यत बघणाऱ्यांनी गर्दी केली होती.
बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर कुलदीप कोंडे युवा मंचच्या माध्यमातून कापूरहोळ (ता. भोर) येथे तब्बल सात वर्षांनी बैलगाडे धावले. यात दीडशेत बैलगाड्यांनी सहभाग घेतला. बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यावर भोर तालुक्यात आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन कुलदीप कोंडे युवा मंचच्या माध्यमातून शासनाच्या सर्व परवानगीनुसार आणि अटी-शर्ती पूर्ण करून, तसेच करोनाचे सर्व नियम पळून केले होते. या शर्यती पाहण्यासाठी सुमारे चाळीस हजारांहून अधिक शेतकरी उपस्थित होते.
या बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांतील बैलगाडा मालक उपस्थित होते. बैलगाडा शर्यतीला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व माजी मंत्री विजय शिवतारे यांनी भेट दिली. शर्यत यशस्वी होण्यासाठी कुलदीप कोंडे, रमेश कोंडे, माऊली शिंदे, अमोल पांगारे, महेश कोंडे, अमित गाडे, योगेश गाडे, गणेश धुमाळ, आदित्य बोरगे, नितीन इंगुलकर, संदीप कोंडे, अक्षय कोंडे, संपत जाधव, बंटी जगताप आदी कार्यकर्त्यांनी योगदान दिले.