भारतीय आयुर्वेदशास्त्र आणि युनानी प्रणालीच्या प्रसिध्द औषधांमध्ये आवळयाचा वापर प्रामुख्याने केलेला दिसतो. आवळा हे रसायन द्रव्य म्हणून ओळखले जाते. आवळा हा मानवी शरीरावर अमृतासमान कार्य करतो. च्यवनप्राशसारख्या रसायन औषधीमध्ये आवळा हे प्रमुख औषधी द्रव्य आहे. ब्राह्मी रसायन, धात्री रसायन, त्रिफळाचुर्ण व आमलकी रसायन अशा औषधांमध्ये आवळा मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
आवळयामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह यांचे प्रमाण भरपूर असते व हे दोन्ही घटक शरीरास उर्जा प्रदान करण्यास व कोणतीही हानी किंवा शरीराची झीज भरून काढण्यास अत्यंत उपयोगी असतात. आवळयात असणारे महत्वाचे कार्यकारी घटक जसे की, टॅनिन्स, फ्लेवोनाईडस् सॅपोनिन असे पोषक घटक हे शरीरात विविध कार्य करतात.
कोव्हिडसारख्या गंभीर आजाराविरोधात लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक असते. ती वाढविण्यासाठी पौष्टीक आहार, नियमित व्यायाम व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे घटक नियमितपणे सेवन करावेत.
आवळा हा पचनसंस्थेवर उत्तम प्रकारे काम करणारे औषध आहे. ऍसिडीटी, गॅस किंवा अपचनाच्या विकारात आवळा हा चुर्ण स्वरूपात किंवा रस या स्वरूपात अत्यंत लाभदाई ठरतो.
पचनसंस्था म्हणजेच पाचक अग्नि हा जर उत्तम प्रकारे कार्य करत असेल तर बहुतेक आजार व्याधी दूर राहतात.
बध्दकोष्ठता असणाऱ्यामध्ये आवळा चुर्ण किंवा कच्चा आवळा पचनक्रिया चांगली करण्यास मदत करतो. आवळयात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पोट साफ करायला मदत करते. तसेच पंचरसांनीयुक्त आवळा हा पचनसंस्थेतील आमाचा निचरा करून त्याची कार्यक्षमता वाढवतो.
आवळा हा शीत गुणयुक्त असतो. त्यामुळे जळजळ पित्तामुळे होणारे पोटाचे व त्वचेचे विकार यात आवळा अत्यंत गुणकारी असतो. अल्सर, गॅस्ट्रायटीस, मळमळ, उलटी अशा पित्तप्रकोपामुळे निर्माण होणाऱ्या व्याधी आवळयाच्या शीत गुणांमुळे व मधुर रसामुळे शमन पावतात. आम्लपित्तावर आवळा हे श्रेष्ठ औषध आहे. तसेच त्वचेवर पित्तामुळे दिसणारी लक्षणे जसे शीतपित्त, रॅश येणे, पुरळ उठणे, चेहऱ्यावरील पिंपल्स् व मुरमे यावर आवळा घेतल्यास फायदा होतो.
शरीरातील कॉलेस्टेरॉलचे प्रमाण देखील कमी करण्यात आवळा उपयुक्त ठरतो. कषाय गुणांमुळे शरीरातील अतिरिक्त पाण्याचे प्रमाण कमी करणे तसेच चरबीचे प्रमाण नियंत्रित करणे, रक्ताभिसरण सुरळीत करणे व रक्तशुध्दीकरणाचे काम आवळा उत्तम प्रकारे करतो.
आवळयामध्ये मुबलक प्रमाणात असणारे व्हीटॅमिन सी शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींना उत्तम प्रकारे कार्य करते. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती ही याच पांढऱ्या पेशींच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. उत्तम रोग प्रतिकारशक्तीसाठी रोज एक आवळा खाणे लाभदायी ठरते.
व्हीटॅमिन सी हे त्वचेचे व डोळयांचे आरोग्य टिकविण्यासाठी तसेच त्वचेला नितळ व कांतीमय बनविण्यास मदत करते. आवळयामध्ये व्हीटॅमिन सी भरपुर असल्यामुळे चेहरा तेजस्वी व केस दाट होतात. आवळयाच्या सेवनाने मुत्ररोग, जळजळ व दुखणे हे मुत्रविकार कमी होतात. शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढणे या किडनीच्या कार्यास आवळा मदत करतो.
हिरडयांच्या निरोगी राहण्यात तसेच तोंडाचे उष्णतेने होणाऱ्या अनेक विकारांमध्ये आवळा चुर्ण व आवळा स्वरस उत्तम कार्य करते.
मधुमेही रूग्णांमध्ये आवळा हा अत्यंत लाभदायी ठरतो. रक्ताभिसरण चांगले करणे, साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे व मधुमेहात होणारे त्वचेचे उपचार कमी करणे यांत आवळा व हळद यांचे मिश्रण उत्तम काम करते.
गर्भवती स्त्रियांमध्ये आवळयांचे सेवन हे अनेक रोगांपासुन बचावासाठी उत्तम औषध ठरू शकते. शरीराचे पोषण करणे तसेच गर्भावस्थेतील मलावरोध व मळमळ कमी करते.
दररोज 1 आवळा खाल्यास-
1. रोज 1 आवळयाचे सेवन, शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यास उपयोगी ठरते. वार्धक्याशी निगडीत लक्षणे व त्वचेची होणारी झीज व सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. त्वचेवरील डाग, फोड तसेच काळसरपणा कमी करण्यास आवळा उपयुक्त ठरतो.
केसांच्या निरोगीपणासाठी तसेच केस काळे राहण्यासाठी आवळयाचे सेवन उपयोगी ठरते. मेहंदी, आवळा, निलगिरी व कडुनिंब पावडर हे मिश्रण केसांना लावल्यास केस गळणे, रूक्ष होणे, खाज सुटणे, कोंडा होणे हे सर्व कमी होते.
मासिक पाळीचा महिला आरोग्याशी अत्यंत निकटचा संबंध असतो. मासिक पाळीचे काम केवळ प्रजोप्तादनच नाही तर विषारी घटक बाहेर टाकणे हेही असते. मासिक पाळी दरम्यान आवळ्यासह मंजिष्ठा, कडुनिंब व हळद यांचे चाटण स्वरूपात केल्यास अत्यंत लाभदायी ठरते.