महापौरांनी मागितला ‘राज्या’कडे निधी

विरोधी पक्षांचे नेते एकवटले : केंद्रावरही टीका

पुणे – ‘करोना संकटासाठी महापालिकेने अडीचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च केले असून, आता राज्यसरकारने महापालिकेला आर्थिक मदत करावी,’ अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

मात्र, “स्वत:चे वेतन पंतप्रधान निधीला देणाऱ्यांनी शहरासाठी किती निधी दिला, केंद्राकडून किती निधी आणला?’ असा प्रश्‍न महापालिकेतील विरोधकांनी उपस्थित केला आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आढावा बैठक झाली. त्यावेळी महापौरांनी निधीची मागणी केली. दरम्यान, शहरात नव्याने तीन जम्बो आयसोलेशन सेंटर उभे करण्यात येणार आहेत. यासाठी एकूण 300 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यात राज्य सरकार 50, पुणे-25, पिंपरी-चिंचवड -12.5 आणि पीएमआरडीए 12.5 टक्के खर्चाचा हिस्सा उचलणार आहेत.

पुणेकरांच्या करातून मिळणारे वेतन महापौरांसह भाजपच्या नगरसेवकांनी पीएम केअर फंडासाठी दिले. त्यानंतर केंद्रीय मंत्री जावडेकर आणि खासदारांनी केंद्राच्या निधीसाठी प्रयत्न केले नाहीत. पुणेकरांसाठी केंद्र काहीच निधी देणार नाही, हे समजल्याने राज्याकडे मदत मागितली जात आहे.
– चेतन तुपे, आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस


स्थायी समितीसह सगळ्या चाव्या भाजपकडे आहेत. करोना संकटात त्यांनी पैसे कमी पडू देता कामा नये. केंद्रातून काय निधी आला, ते महापौरांनी सांगावे. स्वत:चे पैसे पीएम फंडाला दिले. ते दिले नसते, तर आज ही वेळ आलीच नसती.
– अरविंद शिंदे, नगरसेवक, कॉंग्रेस


भाजप लोकप्रतिनिधींनी केंद्राला आपले वेतन मदत म्हणून दिले. पण, राज्य सरकार पुणेकरांसाठी द्वेषभावनेने वागणार नाही. आम्ही जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करू. पण, केंद्र सरकारने पुण्यासाठी काय दिले, हे भाजपने सांगावे.
– पृथ्वीराज सुतार, गटनेते, शिवसेना.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.