पिरंगुट (वार्ताहर) – करोनामुळे पारंपरिक शिक्षणाची परिभाषा बदलत आहे. अनुभवाधिष्ठित शिक्षणाबरोबरच भविष्याचा वेध घेणारे, विद्यार्थी केंद्रित, समयोचित व जागतिक स्पर्धा करणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्याची गरज आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षांमध्ये शाळा व महाविद्यालयांनी नवीन संकल्पना व तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर करावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले.
उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने करोना विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनार, विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी टोपे बोलत होते. एरंडवणा, पौड रोड येथे हा कार्यक्रम बुधवारी (दि. 22) ऑनलाइन झाला. यावेळी स्टर्लिंग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनिरुद्ध टोणगावकर, वायसीएमचे डॉ. प्रवीण सोनी, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सागर पाठक संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ऍड. संदीप कदम, खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव उपस्थित होते.
प्रास्ताविकात ऍड. कदम म्हणाले की, करोनाच्या प्रसारामुळे पारंपरिक शिक्षण पद्धती थांबलेली आहे; परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांचे विचार विद्यार्थ्यांना एकता यावे यासाठी ऑनलाइन अनंत व्याख्यानमाला, चित्रकला, प्रश्नमंजूषा, पोस्टर प्रेझेंटेशन, शिक्षकांसाठी इ-कन्टेन्ट व्हिडिओ व पीपीटी तयार करणे, वृक्षारोपण आदी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माया माईनकर यांनी केले. आभार ऍड. मोहनराव देशमुख यांनी मानले. वेबिनारमध्ये झुम ऍप, फेसबुक व यू-ट्युब लिंकचा वापर करुन संस्थेच्या शाळा व महाविद्यालयातील तीन हजारापेक्षा जास्त शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले होते.