नवी दिल्ली – भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची सुटका करावी या मागणीसाठी त्यांच्या समर्थकांनी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानावर मोर्चा आयोजित केला होता. पण लोककल्याण मार्गावर हा मोर्चा पोलिसांनी अडवला. या मोर्चात भीम आर्मीचे सदस्य आपले हात बांधून सहभागी झाले होते.
आपल्यावर हिंसाचार केल्याचा किंवा दंगली भडकवल्याचा आरोप होऊ नये म्हणून त्यांनी हात बांधून घेतले होते असे आयोजकांनी सांगितले. दिल्लीच्या जोरबाग भागातून हा मोर्चा काढण्यात आला होता पण मोदींच्या निवासस्थानाच्या काही किलोमीटर आधीच तो अडवण्यात आला.
मोर्चातील लोकांनी तेथेच ठिय्या देऊन घोषणाबाजी केली. पण पोलिसांनी नंतर ही स्थिती नियंत्रणात आणली. नागरिकत्व कायदा व एनआरसीच्या विरोधात प्रतिबंधात्मक आदेश मोडून निदर्शने काढल्याच्या आरोपावरून पोलिसांनी चंद्रशेखर आझाद यांना अटक केली आहे.