पुणे – आपण आत्महत्या करत असल्याबाबत एका तरुणाने नातेवाईकांना संदेश पाठवला होता. त्याच्या ओळखीतील एकाने हा मेसेज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखविला. त्यांनी तत्काळ पोलीस आयुक्त रितेश कुमारांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यानंतर गतीने सूत्रेफिरवत स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेने संबंधित तरुणाला शोधत त्याचे समुपदेशन केले.
दत्तवाडी येथील लक्ष्मीनगर परिसरात 32 वर्षीय तरुण कुटुंबासह वास्तव्यास आहे. गृहसजावटीसाठी (इंटेरीयर डिझाइन) लागणारे साहित्य तो पुरवतो. दरम्यान, एकाकडून घेतलेल्या साहित्याचे पैसे देण्यासाठी त्याने दुसऱ्याकडून उधार पैसे घेतले होते. तसेच इतर उधारीदेखील झाली. यातून मोठे कर्ज झाल्यामुळे त्याने टोकाचा निर्णय घेतला.
तसा मेसेज तयार करून त्याने आपल्या ओळखीतील काही जणांना पाठवला. दरम्यान, गृहमंत्री फडणवीस सोमवारी (दि.16) पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या परिचयातील एकाने हा मेसेज त्यांना दाखविला. त्यांनी याची माहिती पोलीस आयुक्तांना दिली.
त्यानंतर अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तरुणाचा पत्ता शोधला. दत्तवाडी पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. त्यांनी तरुणाला पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी करत अडचणी समजावून घेतल्या. त्यानंतर त्याचे समुपदेशन करून त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. ही कार्यवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गृहमंत्र्यांनी आम्हाला एका तरुणासंदर्भात मेसेज पाठविला होता. तो नैराश्यातून आत्महत्येच्या विचारात असल्याचे समजले. तत्काळ गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी त्याला शोधून त्याची आस्थेवाईक चौकशी करत समुपदेशन केले. त्याच्या मनातून आत्महत्येचा विचार काढला.
– रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर